पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा
योजनेत बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

बारामती, दि.११ : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन २०२२-२३ आंबिया बहार मध्ये आंबा, डाळिंब, द्राक्ष व केळी या फळपिकांना लागू करण्यात आली असून या योजनेचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून तालुक्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातीत अधिसूचित पिकासाठी ऐच्छीक आहे. उत्पादनक्षम फळबागांनाच विमा सरंक्षणाचे कवच लागू राहणार आहे. नुकसान भरपाई महावेध प्रकल्पातंर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्रांच्या आकडेवारी नुसार ठरविण्यात येते.

बारामती तालुक्यातील समाविष्ट महसूल मंडळातील आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम १५ हजार ४०० रुपये इतकी आहे.

डाळिंब फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जानेवारी २०२३ असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ९ हजार ७५० रुपये इतकी आहे.

द्राक्ष फळपिकासाठी अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ असून विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम १६ हजार रुपये इतकी आहे.

केळी फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ७ हजार रुपये इतकी आहे.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आंबिया बहारातील फळपिकांची विमा नोंदणी करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल https://pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अधिक माहितीसाठी भारतीय कृषि विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८०० ४१९ ५००४, भ्रमणध्वनी ८०१०७१२५७५ या क्रमांकावर व संबंधित मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.

                               

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *