प्रतिनिधी – बारामती येथील पिंपळी गावात शेतकरी सचिन तांबे हे शेतामध्ये काम करत असताना एक मोठ्या आकाराचे घुबड शेतामध्ये जखमी अवस्थेत पडलेले आढळून आले. तत्काळ त्यांनी बारामती वन विभाग येथील वनरक्षक बाळासो गोलांडे यांच्याशी संपर्क करून संपूर्ण माहिती दिली. गोलांडे यांनी क्षणाचा विलंब न करता वन्यजीव संवर्धनासाठी काम करत असणाऱ्या बारामती मधील रेस्क्यू बारामती या पर्यावरण प्रेमी संस्थेला सदर घटनेची माहिती दिली. तत्काळ बारामती वन विभागाचे कर्मचारी आणि टीम रेस्क्यू बारामतीचे सदस्य हे घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी त्यांना जखमी घुबड शेतामध्ये भेदरलेल्या अवस्थेत आढळून आले जखमी असलेल्या शृंगी घुबडाची पहाणी करुन त्याला ताब्यात घेण्यात आले.
यावेळी बारामती वन विभागाचे वन कर्मचारी तसेच
रेस्क्यू बारामती संस्थेचे सदस्य उपस्थित होते. सदर शृंगी घुबडाला बारामती वन विभाग येथे प्रथम उपचार करून पुढील वैद्यकीय उपचारा साठी वन विभागाच्या वतीने रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट बावधन पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे
सदर घुबड हे शृंगी घुबड आहे. घुबड हा पक्षी निशाचर असल्याने फक्त रात्रीचा आपल्या खाद्यासाठी बाहेर पडतो घुबड हा पक्षी प्रामुख्याने शेतातील उंदरे, छोटे कीटक तसेच सरपटणारे छोटे प्राणी खाऊन आपले जीवन जगतो त्यामुळे घुबड हा एक प्रकारे शेतकऱ्याचा मित्रच आहे घुबडाबाबत अनेक ठिकाणी अंधश्रद्धा आणि गैरसमज बाळगले जातात अशा अंधश्रद्धांना कधीही बळी पडू नये कोणत्याही प्रकारचा वन्य पशु पक्षी जखमी अवस्थे मध्ये आढळुन आल्यास आपल्या भागातील वनविभागाशी संपर्क साधावा आणि वन विभागाला सहकार्य करावे अशी माहिती रेस्क्यू बारामती संस्थेचे श्रेयस कांबळे यांनी दिली