बारामती दि. १ : प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरोग पथक बारामतीतर्फे सिल्वर जुबली उप जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील दानशूर निक्षय मित्र यांच्याकडून क्षयरोग रुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे, सिल्वर जुबली उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका विस्तार अधिकारी सुनील जगताप, तालुका पर्यवेक्षक, एम.एम. मोहिते, एस के येळे, वैद्यकीय अधिकारी, रुग्ण आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.खोमणे यांनी क्षयरोग, सकस आहार व रुग्णांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करून प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानामधील पहिल्या टप्प्यात संपूर्ण बारामती तालुक्यामधील औषध उपचार सुरू असलेल्या एकूण ४३८ रुग्णांना सकस आहार दिला जाणार असल्याचे सांगितले. या अभियानांतर्गत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून समाजामधील दानशूर व्यक्ती, निवडून आलेले पदाधिकारी व औद्योगिक कंपन्यांच्या माध्यमातून क्षय रुग्णांना दत्तक घेऊन सहा महिन्याकरीता सकस आहार दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.मनोज खोमणे यांनी दानशूर निक्षय मित्र अमोल जगताप व कैलास काकडे यांचा श्रीफळ देऊन स्वागत सत्कार केला.
क्षयरोग रुग्णांना आर्थिक मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे (९८२२०२५९५) व तालुका पर्यवेक्षक एम.एम. मोहिते (९४२०१७४२८३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. खोमणे यांनी यावेळी केले.