प्रतिनिधी - दिनांक-22/09/2022 रोजी बारामती तालुक्यातील मौजे- जैनकवाडी ( शेंडे वस्ती ) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी श्री. वैभव तांबे यांचे मार्गदर्शनाखाली रब्बी हंगाम सन -2022-23 तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत भरडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी सौ. सुप्रिया बांदल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी श्री. अरविंद यमगर यांनी केले व श्री.संतोष पिसे कृषी सहाय्यक कऱ्हावागज यांनी ज्वारी व हरभरा लागवड तंत्रज्ञानाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर कृषी सहाय्यक श्री उद्धव चौधर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ज्वारी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले. तालुका कृषी अधिकारी सौ. सुप्रिया बांदल यांच्या हस्ते शेतकरी गटातील शेतकऱ्यांना सुधारीत ज्वारी बियाणे वाटप करण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले व उपस्थित शेतकऱ्यांना बीबीएफ यंत्राद्वारे पेरणीचे महत्त्व व फायदे सांगून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे ज्वारी,हरभरा पिकाची पेरणी करण्याचे अवाहन केले. कार्यक्रमात शेवटी बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
कृषी पर्यवेक्षक श्री. अनंत घोळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कृषि मित्र महादेव शेंडे, सदाशिव शेंडे, सचिन रांधवन, बाळासो माने, सुरेश लोखंडे, शरद लोखंडे ई परिसरातील बहुसंख्य प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
Post Views: 262