बारामती दि. २७: पुरंदर पंचायत समिती सासवड येथील छत्रपती संभाजीराजे सभागृहात कृषि विभागाच्यावतीने शुक्रवारी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेस तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, मंडळ कृषी अधिकारी संजय फडतरे, शेखर कांबळे, अनिल दूर्गुडे, गणपत वाघमारे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे प्रशांत गावडे बँक ऑफ महाराष्ट्रचे महेश सोनवणे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापक निशा शिळीमकर, जिल्हा संसाधन व्यक्ती वैभव कुदळे, विविध लाभार्थी व उद्योजक उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. जाधव यांनी स्मार्ट, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना व इतर योजनांची विस्तृत माहिती दिली. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना अंतर्गत लाभार्थींना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के जास्तीत जास्त १० लाख अनुदान देय असून विविध अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेला उद्योग वाढविण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वैभव कुदळे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेबद्दल माहिती दिली. त्यांनतर कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे प्रशांत गावडे यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याबाबत माहिती दिली.
यावेळी लाभार्थी उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.