प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी बारामती, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, पाणी फाउंडेशन, ग्रामपंचायत जळगाव सुपे व बारामती अग्रोस्टार फार्मर प्रोडूसर कंपनी लि. जळगाव सुपे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळावा व कृषी विषयक चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन जळगाव सुपे येथे काल करण्यात आले होते.
या शेतकरी मेळाव्यास जळगाव सुपे व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी क्षेत्रातील वक्त्यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी भूषवले. तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
पाणी फाउंडेशनचे नामदेव ननावरे गटशेती व आबा लाड यांनी सेंद्रिय शेती, संतोष करंजे यांनी तूर व उडिद पिक व्यवस्थापन, रोहन पवार यांनी पंचायत समिती कृषी योजना याविषयी मार्गदर्शन केले.
बारामती अग्रोस्टार जळगाव सुपे कंपनीने गट शेती माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीकडे केलेली वाटचाल व कंपनीने भागातील शेतकऱ्यांसाठी कृषी सेवा केंद्र व तेलबिया प्रक्रिया उद्योग उभारणी केल्याने शेतकऱ्यांना होणारे फायदे याबाबत सुप्रिया बांदल यांनी आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात जळगाव सुपे, जळगाव क. प, देऊळगाव रसाळ, काऱ्हाटी, नारोळी कुळोली, अंजनगाव व भागातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी व जलमित्र हजर होते. 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंचायत समिती मार्फत सर्वांना फळझाडे रोपे वाटप व कृषी विज्ञान केंद्र मार्फत शेळी फार्म साठी औषध किट व तूर व उडीद पिकांसाठी औषध किट वाटप करण्यात आले.
वैभव तांबे यांनी कृषी विभागातील योजनांची माहिती दिली. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात भौगोलिक परिस्थितीनुसार पीक पद्धती याविषयी माहिती दिली. शेतीतील समस्या यावर मात करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक, सिंचन तुषार सिंचन यातून पाणी बचत करून जास्तीत जास्त शेती क्षेत्र लागवडी खाली आणणे व शेतीचे उत्पादन, उत्पन्न वाढ करण्याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच या कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी सौ. सुप्रिया बांदल, पंचायत समितीचे कृषी अधिकारी पवार, पाणी फाउंडेशनचे नामदेव ननावरे व आबा लाड, पृथ्वीराज लाड, हिना मॅडम व जळगाव सुपे सरपंच कौशल्यताई खोमणे, बारामती अग्रोस्टार चेअरमन सुनील जगताप व सर्व संचालक मंडळ यांनी उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन अनिल वाघ, संतोष जगताप व तुषार वाघ यांनी केले.