प्रतिनिधी – राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना
रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (क्र.१०३/२०११) दाखल करण्यात आली होती. याविषयी सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले. त्यानुसार केंद्रीय अन् राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे. याचसमवेत महाराष्ट्र शासनानेही राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे, यंदा दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा १९५०’, कलम २ व ५ नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान ५ प्रतिबंध अधिनियम १९७१’चे कलम २ नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५०’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे. त्यामुळे अशा लोकांवर व व्यापाऱ्यांवर कारवाही व्हावी यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी मालुसरे वस्ती येथील धर्मप्रेमी श्री. तानाजी मालुसरे, श्री. आप्पाजी मालुसरे, श्री. सोमनाथ जाधव, श्री. नरेंद्र मालुसरे, श्री. संदीप मालुसरे, चि. सार्थक मालुसरे, कु. मृणाल दीक्षित, कु. नंदिनी दीक्षित सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *