कृषी विभागाच्यावतीने पीक स्पर्धेचे आयोजन

पुणे, दि.29: कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात खरीप हंगामासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

पीक स्पर्धेत खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफूल, मूग व उडीद या ११ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यामध्ये १ हजार हेक्टरहून अधिक लागवड क्षेत्र असलेल्या सर्व पिकांकरिता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

पीक स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३०० रुपये प्रति शेतकरी प्रति पीक या प्रमाणे प्रवेश शुल्क आहे.

एक शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येणार आहे. पूर्वी जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क भरुन पीकस्पर्धेत भाग घ्यावा लागत होता. आता मात्र तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. पीक कापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार पीक स्पर्धेतील विजेत्यांची तालुका पातळीवर निवड केली जाणार आहे. मागील दोन वर्षात तालुका पातळीवर प्रथम दोन क्रमांक आलेले आहेत असे शेतकरी जिल्हा पातळीवर पीकस्पर्धेमध्ये भाग घेण्यास पात्र असतील. तालुका व जिल्हा पातळीवरील पीकस्पर्धा स्वतंत्र होणार आहे.

मूग व उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ आणि इतर पिकामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२२ असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *