शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी वेगवेगळ्या विपणन पद्धतींचा अवलंब करा – प्रकल्प उपसंचालक अंकुश बरडे

बारामती दि. २८: शेतीच्या उत्पादनाला कायमस्वरूपी, स्थीर व चांगला दर मिळण्याची हमी कमी असते. त्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या विपणन पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन आत्मा पुणेचे प्रकल्प उपसंचालक अंकुश बरडे यांनी केले.

कृषि विज्ञान केंद्र बारामती, राष्ट्रीय कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र बारामती येथे आयोजित ‘वायदे बाजाराची ओळख’ या शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संचालक व पदाधिकारी कार्यक्रमात श्री. बरडे बोलत होते. यावेळी एफ.पी.ओ. विभागाचे उप व्यवस्थापक रोहन धांडे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.धीरज शिंदे, विषय विशेषज्ञ संतोष गोडसे, राष्ट्रीय कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकारी इति बेदी आदी उपस्थित होते .

श्री. बरडे म्हणाले, शेतकऱ्यांना व शेतकरी उत्पादक कंपन्यांना वायदे बाजारमध्ये सहभागी होवून आपला शेतमाल जास्त अपेक्षित भावाने विकण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ग्राहकांची गरज काय आहे, आपण काय उत्पादन करतो याचाही विचार त्यानी करावा. शेतकऱ्यांचा रसायन अंश मुक्त शेती उत्पादन करण्याकडे कल असायला हवा, असेही ते म्हणाले.

डॉ. धीरज शिंदे म्हणाले, कृषी विज्ञान केंद्राने ३० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी आता काळानुरूप आपल्या पिक पद्धतीमध्ये बदल करायला हवा. शेतकऱ्यांनी शेतीमालावर प्रक्रिया करावी तरच त्यांना चांगला भाव मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

श्री. रोहन धांडे यांनी वायदे बाजाराची ओळख, राष्ट्रीय कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजवर व्यापार कसा करावा व नोंदणी कशी करावी या बद्दल सादरीकरणाने माहिती दिली. शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी आपला शेतीमाल गोडावूनमध्ये ठेवून पुढील २ ते ४ महिन्यात बाजार भावात असलेली अस्थिरता कमी करत आपला शेत माल जास्त मूल्याने विक्री करू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी असणे गरजेचे आहे. वायदे बाजारात मूल्य जोखीम व्यवस्थापन केले जाते व दररोजचे व पुढील काळातील बाजारभाव प्रसिद्ध केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीमती इति बेदी यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले. कार्यक्रमास बारामती, इंदापुर, दौंड व शिरूर तालुक्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *