पुणे, दि. ४: खरीप हंगाम २०२२-२३ करीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

ही योजना अधीसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असून कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना ऐच्छिक आहे, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदाराचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजने अंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतक यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहेत, या प्रकारची प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

या योजनेअंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणी पर्यंत कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ चक्रीवादळ, पुरक्षेत्र जलमय होणे, भुसखलन, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नैसर्गीक कारणांमुळे पिकाचे होणारे काढणी पश्चात नुकसान अशा जोखमीच्या कारणांमुळे होणा-या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाणार आहे.

ई-पीक पाहणी अंतर्गत पीकांची नोंद करण्यात यावी. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदविण्यात आलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उदभवल्यास ई-पीक पाहणी मध्ये नोंदविण्यात आलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे.


अधिक माहिती माहितीसाठी आय.सी.आय.सी.आय जनरल लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी, पुणे टोल फ्री क्रमांक -१८००१०३७७१२, ई-मेल आयडी customersupportba@icicilombard.com वर ई-मेल करावे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा,राष्ट्रीयकृत बँकेचा शाखा, नजिकचे विविध कार्यकारी सोसायट्या, कृषि खात्याचे कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, पुणे, खेड, बारामती व जवळचे सीएससी सेंटर यांचे तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच क्षेत्रीय स्तरावरील संबंधीत कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *