बारामती दि. २४ : कृषी विभागाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजनेत निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ‘पुरंदर लक्ष्मी महिला शेतकरी उत्पादक कंपनी’ चे भूमिपूजन पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत काल झाले.
यावेळी संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण दिलीप झेंडे, आत्माचे संचालक श्री. तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, आत्मा प्रकल्प उपसंचालक श्रीमती खटावकर, नाबार्डचे अधिकारी सचिन कांबळे, रोहन मोरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजर श्री. कांबळे, तालुका कृषी अधिकारी पुरंदर सूरज जाधव, मंडळ कृषी अधिकारी शेखर कांबळे झेंडेवाडीच्या, सरपंच पूनम झेंडे व सदस्य उपस्थित होते.
यावेळी संचालक श्री. तांभाळे व संचालक दिलीप झेंडे यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
झेंडेवाडी येथील २० महिलांनी एकत्र येऊन शेतकरी गट स्थापन केला होता. या गटाचे रूपांतर महिला शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये झाले आहे. एकूण ३५० भागधारक असलेली ही कंपनी फळे व भाजीपाला प्रक्रिया करून शीतगृहामध्ये साठवणूक करत आहे. यामुळे नाशवंत मालाचे होणारे नुकसान कमी होत आहे. तसेच महिलांच्या हाताला रोजगार मिळाला असून आर्थिक फायदा होत आहे. विकेल ते पिकेल अंतर्गत स्मार्ट प्रकल्पामध्ये या कंपनीची निवड झाली असून ९७ लाखाचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.