बारामती दि. २२ : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत ‘ फळबाग लागवड योजना’ कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत आंबा,चिकू, पेरू, डाळिंब का. लिंबू, संत्रा, मोसंबी, सिताफळ, नारळ, आवळा, अंजीर, जांभुळ, चिंच, फणस, शेवगा, काजू, ड्रॅगनफुट अॅव्हाकॅडो, केळी, द्राक्ष. या पिकाचा समावेश असून गुलाब, मोगरा व निशीगंध या फुलपिकांसाठी सुध्दा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लागवडीस परवानगी देण्यात आलेली आहे.
वैयक्तिक बांधावरील फळपिके लागवडीसाठी हेक्टरी २० रोपे या मर्यादेत ही योजना राबविण्यात येते. क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु देय अनुदान फळपीक लागवडीचे निकष, विद्यापीठ शिफारशीनुसार अंतर मर्यादेतच देय राहील. अतिरीक्त कलमे, रोपे यांचे अनुदान देय राहणार नाही. लागवड वर्षासह सलग ३ वर्षात मंजुर अंदाजपत्रकानुसार अनुदान देय राहील. दुस-या व तिस-या वर्षी बागायती फळपिकांकरीता जे लाभार्थी ९० टक्के फळझाडे जिवंत ठेवतील व कोरडवाहू फळपिकाचे ७५ टक्के फळझाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुस-या व तिस-या वर्षाचे अनुदान देय राहणार आहे.
लाभार्थी निकष– कमीत कमी ०.०५ हेक्टर व जास्तीत जास्त २.०० हेक्टर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा आहे. इच्छुक लाभधारकाच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. सातबारास कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, भटक्या जाती. द्रारिद्रय रषेखालील व्यक्ती अल्प, अत्यल्प भूधारक, महिला लाभार्थी व दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी ग्रामपंचायतीचे जॉबकार्ड धारक असावा.
सलग क्षेत्रावर फळबाग लागवड व बांधावर फळझाडे लागवडसाठी शेतकऱ्यांनी संबंधीत गावचे कृषि सहाय्यक यांचेकडे अर्ज करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.