बारामती दि. १८: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी आहे. समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी काम केले. सर्व जाती धर्माच्या श्रद्धास्थानांचे जतन, जिर्णोद्धार करून समाजात त्यांनी एक आदर्श निर्माण केला, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
बारामती येथे आयोजित राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव २०२२ व बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास देवकाते आदी उपस्थित होते.
श्री. मुंडे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी तीनशे वर्षापूर्वी सती जाण्याची प्रथा बंद करण्याचा विचार समाजात रुजवला. त्यांनी लोककल्याणकारी कार्य करून एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन बारामती येथील अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान हे गेल्या ३० वर्षांपासून अहिल्या देवीची जयंती साजरी करून चांगला उपक्रम राबवत आहे. या उपक्रमात गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती यांना समाजरत्न, समाजभूषण, अहिल्या देवी पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असल्याने त्यांना प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले.
श्री. भरणे म्हणाले, सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी शासन कटिबद्ध आहे. सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे अहिल्यादेवींचे स्मारक उभारण्यासाठी साडे चौदा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचेही काम लवकरच सुरू होईल, असेही ते म्हणाले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, अहिल्यादेवींचे कार्य आणि विचार सर्वधर्म समभावाचे होते. ३०० वर्षापुर्वीचे त्यांचे विचार आजही समाजाला मार्गदर्शक आहेत. खडकवासला मतदारसंघात २९ ग्रामपंचायतीमध्ये विधवा प्रथा बंद करावी यासाठी ठराव मंजूर करण्यात आले आहे. समाजात महिलांना सन्मान मिळायला हवा असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, दहावी बारावीत चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना समाजरत्न, समाजभूषण आणि अहिल्यादेवी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक विश्वास देवकाते यांनी केले.