आज नवे तंत्रज्ञान आले असले तरी बरेच शेतकरी पारंपरिक शेतीसाठी जनावरांचा उपयोग करतात. विशेषत: शेतीकामासाठी बैल आणि दूधासाठी गाई-म्हशींचे शेतकऱ्यासाठी खूप महत्व आहे. सोबत शेळी-मेंढी पालनासारखे जोड व्यवसायदेखील त्याच्या उत्पन्नात भर घालतात. त्यामुळे पावसाळ्यात अशा जनावरांची काळजी घेणे महत्वाचे आहे.

पावसाळ्यात आर्द्रता वाढते आणि ऊन कमी असल्याने गोठा ओलसर रहातो. त्यामुळे जनावरांना विविध प्रकारचे होतात. जनावरांची योग्यप्रकारे काळजी घेतली तर आजार कमी होवून पशुपालकाचे आर्थिक नुकसान होत नाही. बदलत्या वातावरणात प्राण्यांचे शरीर योग्यप्रकारे साथ देत नसल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होवून जनावरे विविध प्रकारच्या आजारास बळी पडतात. त्यामुळे गोठ्याची काळजी, लसीकरण, जंतनाशक औषधीचा वापर, चाऱ्यांचे योग्यप्रकारे नियोजन करुन आपल्या जनावरांची पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

गोठ्याचे व्यवस्थापन

गोठ्यात पाणी येणार नाही याबाबत काळजी घ्यावी. पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणानी गोठा धुवून घ्यावा. गोठ्यात सुर्यप्रकाशासोबतच हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या असणे गरजेचे आहे. त्यामुळे गोठ्यातील जागा कोरडी राहण्यास मदत होईल आणि गोठ्यातील जनावरे एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून रवंथ करतील. गोठ्यातील दलदल कमी झाल्यास स्तनदाह आजार कमी होण्यास होतो. 

पावसाळ्यात गोठ्यात पाणी साचणार नाही याचीदेखील दक्षता घ्यावी. जनावरांचे मलमूत्र वेळीच स्वच्छ करून गोठा कोरडा करावा. निश्चित कालावधीत गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे. गोठ्यातील हवा खेळती राहिल्यास आणि सुर्यप्रकाश असल्यास जनावरांच्यादृष्टीने चांगले वातावरण रहाते.

चारा व्यवस्थापन

जनावरांना पावसाने भिजलेला ओला चारा खाण्यासाठी देण्यात येवू नये. ओले गवत मऊ असल्याने जनावरे ते कमी वेळेत अधिक प्रमाणात खातात. परंतु त्यात पाण्याचे प्रमाण अधिक आणि तंतूमय पदार्थ कमी असल्याने जनावरांची पचनक्रिया बिघडून त्यांना जुलाब होतात. त्यामुळे  जनावरांसाठी देण्यात येणारे पशुखाद्य किंवा सुका चारा कोरडा राहील याबाबत दक्षता घ्यावी. 

जनावरांना बाहेर चरण्यासाठी घेवून जातांना विशेष काळजी घ्यावी. जनावरांना पाऊस किंवा विजा पडतांना झाडाखाली घेवून थांबू नये. जवळपास निवारा असल्यास त्याठिकाणी घेवून थांबावे. पावसाळ्याच्या सुरुवातीस बागायती क्षेत्रात फुलीचे गवत मोठ्या प्रमाणात आढळून येते. जनावरांना फुलीचे गवत खावू घातल्यास विषबाधेमुळे कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन जनावरे दगावतात. विशेषत मेंढ्यामध्ये हा प्रकार आढळून येतो.

पावसाळ्यातील वातावरण विविध कृमींसाठी अनुकूल असते. त्यामुळे विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. जनावरांच्या सभोवतीचे वातावरण स्वच्छ आणि कोरडे ठेवल्यास त्यांना होणारा आजाराचा संसर्ग टाळता येतो. त्यासोबतच त्यांचे पोषण आणि पावसाळ्यातील आजाराबाबत माहिती करून घेत योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.

जिल्हा माहिती कार्यालय पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *