पुणे, दि.9: खरीप हंगाम 2022 मध्ये किमान 75 ते 100 मी.मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी तसेच पेरणीसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले सोयाबीन बियाणे वापरावे, असे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.
जमिनीत चांगली ओल झाल्यावर म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. प्रती हेक्टरी बियाणे प्रमाण 75 किलोग्रॅमवरून 50 ते 55 किलोग्रॅमवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करुन पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे.
पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे उपयुक्त ठरते. प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतरच त्याची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी, असेही त्यांनी कळवले आहे.