शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनांचा दर्जा व वेगळेपणा जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 24 : शेतकरी बांधवांनी त्यांच्या कृषी उत्पादनाचा दर्जा आणि वेगळेपणा जपून गुणवत्तापूर्वक उत्पादने तयार करण्याची गरज आहे. जागतिक पातळीवर राज्याची ओळख निर्माण करण्यासाठी गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादनांची निर्मिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी भौगोलिक मानांकन हा एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात राज्यातील 12 भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यात मंगळवेढा मालदांडी ज्वारी, नवापूर तूरडाळ, भिवापूर मिर्ची पावडर, पुणे आंबेमोहोर तांदूळ, महाबळेश्वर ड्राय स्ट्रॉबेरी, सांगली हळद, आजरा घनसाळ तांदूळ, वायगाव हळद, डहाणू चिक्कू पावडर, सांगली बेदाणा, वेंगुर्ला काजू, भंडारा चिन्नोर तांदूळ या उत्पादनांचा समावेश आहे. या शुभारंभप्रसंगी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार तथा प्राधिकृत अधिकारी बाबासाहेब पाटील, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी व पदुम विभागाचे सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, प्राधिकृत अधिकारी मंडळ सदस्य नंदकिशोर सूर्यवंशी यांच्यासह राज्यातील विविध भागातून आलेले शेतकरी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ आज करण्यात आला. या माध्यमातून शेतकऱ्यांची गुणवत्तापूर्ण उत्पादने आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. सध्या मॅाल संस्कृती पुढे येत असून या संस्कृतीत शेतकऱ्यांची कृषी उत्पादने टिकून ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण होणे गरजेचे आहे.
सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, ग्राहक हा चोखंदळ असतो. त्याला चांगली उत्पादने हवी असतात. ग्राहकाला भौगोलिक मानांकन प्राप्त असलेली उत्पादने ही अधिक विश्वासार्ह वाटतात. गुणवत्ता व दर्जा टिकवून ग्राहकांचा विश्वास संपादन करता येते.
भौगोलिक मानांकन (जीआय) म्हणजे एखादी वस्तू व उत्पादनास विशिष्ट स्थानामुळे प्राप्त झालेला असाधारण गुणधर्म, दर्जा आणि वेगळेपणा होय. वस्तू व उत्पादनांना वैज्ञानिक विश्लेषण, वैशिष्टपूर्ण गुणधर्म व पारंपरिक इतिहास सिद्ध केल्यावरच भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त होते. केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्याद्वारे भौगोलिक मानांकन देण्यात येते. जीआय टॅगमुळे फसवेगीरीस आळा बसतो व अस्सल दर्जाची उत्पादने असल्याची ग्राहकाला शाश्वती मिळते.