ई-बाईक्सच्या अनधिकृत वापराबाबत नागरीकांना जाहीर आवाहन

बारामती दि 23: महाराष्ट्र शासनाने पर्यावरण पूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 लागू केले आहे. ई-बाईक्स व ई-वाहने यांना मोटार वाहन करातून धोरण कालावधीसाठी शंभर टक्के सूट देण्यात आली आहे.
केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 2(u) मध्ये बॅटरी ऑपरेटेड व्हेईकलचा व्याख्या दिली असून त्यानुसार 250 वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच ज्या वाहनांची वेगमर्यादा ताशी 25 किलोमीटर पेक्षा कमी आहे, अशा ई-बाईक्सना नोंदणीपासून सूट आहे. अशाप्रकारे वाहन उत्पादन करणाऱ्या उत्पादकास वाहन विक्री करण्यापूर्वी त्या वाहन प्रकाराची चाचणी ही केंद्रिय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम १२६ मध्ये विहित केलेल्या संस्थांकडून टाइप अप्रुवल टेस्ट रिपोर्ट  घेणे अनिवार्य आहे. अशा प्रमाणपत्राच्या आधारे परिवहन आयुक्त कार्यालय अशा वाहनांना नोंदणीतून सूट देते 
काही वाहन उत्पादक मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-बाईक्सची विक्री करतात. ज्या ई-बाईक्सना वाहन उत्पादन करण्याची मान्यता मिळाली आहे अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करुन अशा वाहनांची बॅटरी क्षमता 250 वॅट पेक्षा जास्त करतात अथवा वाहनांची वेगमर्यादा ताशी 25 किलोमीटरपेक्षा अधिक करतात. बेकायदेशीर बदल करुन वाहन विक्री केल्यास रस्ता सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ई-बाईक्सना आग लागून अपघात होत असल्याच्या घटना वारंवार निदर्शनास आलेल्या आहेत.
प्राधिकृत संस्थेने मान्यता दिलेल्या मानकांनाप्रमाणे वाहन असल्याची खातरजमा नागरीकांनी करावी व अशी वाहने खरेदी करण्यापूर्वी संबंधित वाहन वितरक व उत्पादक यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेचा टाइप अप्रुवल टेस्ट रिपोर्ट व परिवहन आयुक्त कार्यालय यांनी जारी केलेल्या परवानगीची प्रत असल्याची खातरजमा करावी.

   वाहन उत्पादक, वितरक व नागरीकांनी अशा वाहनांमध्ये अनधिकृत बदल करु नये. अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत. नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा वाहनांची तसेच अशी वाहने उत्पादीत करणारे व विक्री करणारे यांच्याविरुध्द विशेष तपासणी मोहिम  राबविण्यात येणार आहे.

    वाहन उत्पादक, वाहन वितरक व 

वाहनधारक यांच्याविरुध्द मोटार वाहन कायदा, 1988 तसेच भारतीय दंड संहिते अंतर्गत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या सूचना सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. विक्रेते, वाहन उत्पादक व नागरीक यांनी याची दखल घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांनी कळविले आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती यांच्या कार्यक्षेत्रात 25 मे पर्यंत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे, ई बाईक व वाहनधारकांनी तपासणी साठी सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
                         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *