बारामती दि 5: पालखी महामार्गावर मुल्यांकन केलेल्या दिनांकानंतर म्हणजेच संबधीत जमीनीची ३ (ए) अधिसुचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकानंतर बेकायदेशीरपणे झाडाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मुल्यांकन व नुकसान भरपाई नियमानुसार अदा करता येणार नाही, असे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय महामार्ग उपक्रमांतर्गत बारामती आणि इंदापूर तालुक्यात पालकी महामार्गाचे काम सुरू आहे. अधिसुचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अनुसूचित नमूद केलेल्या जमिनी बोजा विरहीत केंद्र शासनाकडे निहित झाल्या आहेत. सक्षम प्राधिकारी यांनी कायद्याप्रमाणे अधिकारांचा वापर करून संपादनाखालील जमिनीची हित संबंधितांना द्यावयाची नुकसान भरपाई निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तरीदेखील काही व्यक्ती संपादीत जमिनीच्या मूल्यांकनाच्या दिनांकानंतर बेकायदेशीरपणे झाडाची लागवड करुन त्याच्या मोबदल्याची मागणी करत आहेत आणि पालखी महामार्गाच्या कामात अडथळा आणत असल्याची बाब निदर्शनास आली आहे, अशा बेकायदेशीर लागवड केलेल्या झाडांची नुकसान भरपाई अदा केली जाणार नसल्याचे श्री. कांबळे यांनी केले.