भिलारवाडी येथील रोहयोअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन
बारामती दि 2: जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत 10 हजार विहिरींचे पुनर्भरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भिलारवाडी येथील शेतकऱ्यांनीही शासनाच्या अधिकाधिक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करून प्रशासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बारामती तालुक्यातील भिलारवाडी येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या विहीर पुनर्भरण आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पेव्हर ब्लॉकच्या कामांचे भूमिपूजन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर आदी उपस्थित होते.
भूजल पातळीत वाढ करण्यासाठी विहीर पुनर्भरण उपयुक्त आहे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विहिरींच्या पुनर्भरणाची कामे करून घ्यावीत. रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘घर घर गोठा’ ही योजनाही चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातही खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे चालली आहेत. कामे चांगल्या दर्जाची आणि गतीने करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान प्राप्त ट्रॅक्टरचेही उद्धघाटन डॉ. देशमुख यांनी केले. यावेळी लाभार्थी शकुंतला जाधव उपस्थित होत्या. नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी भिलारवाडी येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चाललेल्या कामांचीही पाहणी केली.
विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे आणि गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी माजी सरपंच कल्याण चव्हाण, कृषी सहायक तृप्ती गुंड, ग्रामसेवक अजित जाधव, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.