पुणे, दि. २६ : शिक्षणात समाज परिवर्तनाची क्षमता असते आणि भारती विद्यापीठाचे कार्य याच दिशेने सुरू आहे. विद्यापीठाने अभ्यासक्रम आणि शैक्षणिक प्रक्रियेत काळानुरूप बदल करून कौशल्य विकासावर भर द्यावा, असे आवाहन आरोग्य आणि कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांनी केले.
भारती विद्यापीठाच्या 27 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, पद्मश्री डॉ.गणेश देवी, भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, कुलगुरू माणिकराव साळुंके, डॉ. के. एच. संचेती, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, डॉ.अस्मिता जगताप उपस्थित होते.
श्री. टोपे म्हणाले, शिक्षणाची व्याप्ती वाढली आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आणि आधुनिक शिक्षणासोबतच मानवतेचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न व्हावा. नवीन शैक्षणिक धोरणात या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञान येत आहे, या तंत्रज्ञानाचा शैक्षणिक संस्थांनी स्वीकार करावा. शैक्षणिक क्षेत्रात त्यादृष्टीने बदल करण्याची गरज आहे.
स्वर्गीय पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठ स्थापन करून शैक्षणिक क्षेत्राला नवी उभारी देण्याचे कार्य केले. शैक्षणिक क्षेत्रात भारती विद्यापीठाने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचा उल्लेख श्री.टोपे यांनी केला.
राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, भारती विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. स्वर्गीय पतंगराव कदम यांनी ग्रामीण भागात शिक्षणासाठी होणारी अडचण लक्षात घेत शैक्षणिक संस्था सुरू केली. भारती विद्यापीठाच्या ग्रामीण भागातील ८५ शाळांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. कोरोना कालावधीत भारती विद्यापीठाने केलेल्या कार्याची दखल देश पातळीवर घेतली गेली. आरोग्य मंत्री श्री. टोपे, डॉ. संचेती, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले.
पद्मश्री डॉ.गणेश देवी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. भारती विद्यापीठाला महाराष्ट्राच्या प्रगतशील विचाराचा वारसा लाभला आहे. शैक्षणिक क्षेत्रात संस्थेने केलेले कार्य महत्व्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.के.एस. संचेती व सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा जीवन साधना पुरस्काराने गौरव करण्यात आला. श्री.संचेती व श्री. आढाव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.