२९ जुलै निमित्त बारामतीत विवेक जागृती अभियानाचे लक्षवेधी आंदोलन

बारामती ः पाठीमागील देवेंद्र फडणवीस सरकारने एसटी आरक्षणप्रश्नी धनगर समाजाची घनघोर फसवणूक केली, त्याचप्रमाणे विद्यमान उद्धव ठाकरे सरकारही धनगर समाजाची उपेक्षा करत असल्याचा निषेध म्हणून गुरूवारी (ता. २९) धनगर विवेक जागृती अभियानाच्या वतीने बारामतीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर आरक्षणप्रश्नी तातडीने कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारने मंत्री समिती स्थापन करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय इमारतीसमोर काळा पोशाख घालून हे आंदोलन करण्यात आले. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने धनगर समाजाचे खच्चीकरण केल्याचे फलक आंदोलकांच्या हाती होते. बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने मंत्री समिती स्थापन करून तातडीने कार्यवाही करावी, तेसच केंद्र शासनाने समन्वय समिती स्थापन करून याप्रश्नी पाठपुरावा करावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

आंदोलनाची भुमिका मांडताना विक्रम ढोणे म्हणाले की, धनगर आरक्षणाचा संपुर्ण अभ्यास केला आहे, आम्हीच आरक्षण देणार अशी भुमिका भाजपचे नेते २०१४ च्या निवडुकांपुर्वी मांडत होते. देवेंद्र फडणवीस हे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून बारामतीच्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी २९ जुलै २०१४ रोजी भाजपचे सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार, असे घोषित केले होते. प्रत्यक्षात फडणवीस यांनी पाच वर्षे समाजाचा विश्वासघात केला. समाजाचे खच्चीकरण करून दलाल आणि गुलाम तयार केले. हा प्रकार धनगर समाजातील जागरूक तरूण विसरलेला नसल्याने तीन वर्षांपासून २९ जुलैला धनगर समाज विश्वासघात दिवस पाळला जात आहे. त्याअंतर्गत आज (२९ जुलैला) बारामतीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यासंदर्भाने भाजपने केंद्र सरकारच्या पातळीवरून पाठपुरावा करायचे धैर्य दाखवावे, असेही ढोणे म्हणाले.

धनगर वेशभुषा करणारे नेते गेले कुठे

फडणवीस सरकारच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते सातत्याने धनगर आरक्षणप्रश्नी बोलत होते. विधीमंडळात धनगर समाजाची वेशभुषा घालून पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे हे नेते लक्ष वेधत होते. मात्र या सर्व नेत्यांना आता या प्रश्नाचा विसर पडला नाही, मात्र आम्ही त्यांना विसरू देणार नाही. आठवण करत राहू, असेही विक्रम ढोणे म्हणाले.
या आंदोलनात प्रवीण गदडे,सुरेश हक्के, युवराज हाक्के, तात्यासो खांडेकर आदी सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *