प्रतिनिधी – राष्ट्रीय मधमाशी मंडळ नवी दिल्ली, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ ते २७ मार्च,२०२२ या दरम्यान शास्त्रोक्त मधमाशीपालन या विषयावर शेतकऱ्यांसाठी ७ दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांनी मधुमक्षिका पालन हे कशा पद्धतीने रोजगार निर्मिती साठी उपयोगी आहे व मधमाशी पासून मिळणारे विविध उत्पादने यांविषयी माहिती देत, या उत्पादनांचे विक्रीव्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.
   डॉ. सी.एस.पाटील, प्रमुख, कृषि कीटक शास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी मधमाशीच्या विविध जाती, मधमाशीचे परपरागीभवनात महत्व, कृत्रिमरित्या राणी माशीची पैदास, मधमाशी पासून मिळणाऱ्या अनमोल अशा राजान्न, मधमाशीचे विष इत्यादी उत्पादने, मधमाशांचे कीड व रोग आणि शत्रू व त्यांचे व्यवस्थापन अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

डॉ.मिलिंद जोशी, विषय विषेशज्ञ (पीक संरक्षण), कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी मधमाशी पालनासाठी योग्य जातीची निवड, तसेच स्थलांतर, व्यासायिक दृष्ट्या विविध अनुदानित योजना या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. श्री.प्रशांत गावडे व श्री.अल्पेश वाघ यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मधमाशीची हाताळणी, नैसर्गिक पद्धतीने शुद्ध मधाची काढणी, मधमाशी पालनासाठी लागणारे विविध साहित्य, मधमाशी पासून जास्तीत जास्त मधाचे उत्पादन घेण्यासाठी फुलोऱ्याचे व्यवस्थापन, इत्यादी गोष्टींची प्रात्यक्षिकांसहित माहिती दिली. उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना प्रक्षेत्र भेटीसाठी मध संचालनालय खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर येथे नेण्यात आले त्याठिकाणी केंद्राचे उपसंचालक श्री. नारायणकर यांनी नैसर्गिक पद्धतीने सातेरी मधमाशीचे शुद्ध मध काढणीचे प्रत्याक्षित दिले.
कार्यक्रमाच्या समारोप दिवशी कृषि कीटक शास्त्र विभाग पुणेचे डॉ.गणेश बनसोडे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना जागतिक बाजारपेठेत मधमाशीपासून मिळणाऱ्या पदार्थांचे महत्व व्यक्त करत मधमाशी उद्योजक घडवण्याचे आवाहन केले. नंतर उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. डॉ. मिलिंद जोशी यांनी प्रशिक्षणार्थ्यांबरोबर सदर विषयांतील शंका निरसन करून आभार मानले. यावेळी २५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *