प्रतिनिधी ( रियाज पठाण ) जिद्द ,चिकाटी व अभ्यासातील सातत्याच्या जोरावर कळंब ता- इंदापूर येथील आजम जहाँगीर आळंद यांनी पीएसआय परीक्षेतील यशाला गवसनी घातली आहे. त्यांचे यश नवोदित विद्यार्थी, विद्यार्थिनीना प्रेरणादायी ठरले आहे. प्रतिकूल परिस्थिती वर मात करून त्याने हे यश मिळवल्याने सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक करण्यात येत आले.
आजम यांचे प्राथमिक शिक्षण वालचंदनगर पाठशाळेत व माध्यमिक शिक्षण श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर तसेच इंजिनिअरिंग पदवी (बी.ई.) विद्या प्रतिष्ठान, बारामती येथून घेतली . लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले असताना देखील आजमने वाचनावर अधिकाअधिक लक्ष केंद्रित करत दररोज आठ ते दहा तास अभ्यास करुन प्रतिकुल परिस्थितीवर मात केली. आई, भाऊ, चुलते, मित्रपरिवार व मार्गदर्शक शिक्षकांचा पीएसआय बनण्यामागे मोलाचा वाटा असल्याचे आजमने सांगितले . त्यांच्या कुटुंबात आई रुकसाना ,मोठा भाऊ इब्राहिम हे शिक्षक , बहिण प्राध्यापिका व वहिनी फार्मसिस्ट आहेत.
आजमने पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.2020 ला एमपीएससी तून मंत्रालय लिपिक पदी निवड झाली. परंतु एवढ्यावर समाधान न मानता तयारी सुरूच ठेवली व 25 मार्च 2022 रोजी लागलेल्या एमपीएससी च्या पी एस आय पदाच्या अंतिम यादीत ओबीसी मधून राज्यात 25 व्या क्रमांकाने निवड झाली .उल्लेखनीय बाब म्हणजे त्याने लेखी परीक्षेत राज्यात सर्वाधिक 147 गुण मिळवले आहेत.
“यशाचे सर्व श्रेय मोठ्या भावास जाते कारण त्यानेच एमपीएससी परीक्षेसाठी मला प्रेरणा दिली . आईचा आशीर्वाद व कुटूंबाच्या साथीने मी हे यश मिळवू शकलो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिद्द,संयम व चिकाटी ठेवत अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश हे निश्चित मिळेतेच.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत मार्गदर्शन होण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे ” आजम जहांगीर आळंद (नूतन पोलीस उपनरीक्षक)