महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रर्वगातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे दौंड तालुक्यातील मौजे राजेगाव येथील शेतकरी नामदेव लोंढे यांना शेतीतून अधिक उत्पन्न घेणे शक्य झाले आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील गरीब व होतकरु शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होतांना दिसत आहे. लोंढे यांची राजेगाव शेजारील माळरानावर ३ एकर शेती आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती तशी हलाखीचीच होती. माळरानावरील जिराईत शेतीत ते वर्षातून फक्त एकदाच पीक घेत असत. जिरायती शेतीत उत्पन्नाला मर्यादा आणि अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने ते स्वत: मोलमजूरी करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत. अशात त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेची माहिती मिळाली.
योजनेअंतर्गत कागदपत्रांची पूर्तता करुन सन २०१९-२० मध्ये त्यांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यांना नवीन विहिर बांधणी, विजजोड व पंपसंच यासाठी २ लाख ७८ हजार ८०५ रुपये इतके अनुदान प्राप्त झाले. अनुदान मिळाल्यानंतर त्यांनी शेतामध्ये नवीन विहिर बांधली. विजजोडणी घेऊन पंपसंच बसविला. आता त्यांच्या शेतात ऊस, हरभरा, तुर इत्यादी पीके पाहवयास मिळत असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आता समाधान पाहवयास मिळत आहे.
सध्या शेतीला विहिरीच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाल्यामूळे मी हवी ती पीके घेऊ शकतो. माझी जिराईत शेती आता बागाईत झाली आहे. शासनाने केलेल्या मदतीमुळे माझी आर्थिक परिस्थितीही आधीपेक्षा सुधारली आहे, असे श्री. लोंढे आर्वजून सांगतात.
दिनेश अडसूळ कृषि अधिकारी पंचायत समिती दौंड- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत तालुक्यातील मौजे बोरीबेल, मलठण व काळेवाडी येथील शेतकऱ्यांनाही जुनी विहीर दुरुस्ती व ठिबक सिंचनासाठी लाभ देण्यात आले आहेत. या योजनेचा गरीब शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होतांना दिसत आहे.
माहिती सहायक,
उप माहिती कार्यालय, बारामती