बारामती ः एसटी आरक्षणप्रश्नी धनगर समाजाची घनघोर फसवणुक करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा, तसेच आरक्षण प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी गुरूवार, ता. २९ जुलै २०२१ रोजी बारामती येथील प्रशासकीय इमारतीसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी ही माहिती दिली.

यासंदर्भातील प्रसिद्धी पत्रकात ढोणे यांनी म्हटले आहे की, आरक्षणप्रश्नी धनगर समाजाची आजवरची सर्वांत मोठी फसवणूक बारामती येथे २९ जुलै २०१४ रोजी झाली असून ती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. २०१४ साली बारामतीत झालेल्या धनगर समाजाच्या आंदोलनाला भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांनी भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षण देतो, असे जाहीरपणे सांगितले. प्रत्यक्षात धनगर समाजाची घोर फसवणूक त्यांनी केली. याचा निषेध म्हणून २९ जुलैला धनगर समाज विश्वासघात दिवस आम्ही पाळत आहोत. धनगर समाजाची फसवणूक करणाऱ्या फडणवीस सरकारमध्ये शिवसेना हा प्रमुख पक्ष होता. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजवर अनेकदा धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे, मात्र काहीही सकारात्मक हालचाल केलेली नाही. आता त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार असतानाही या विषयाकडे दुर्लक्ष चालवलेले आहे. या शासकीय भुमिकांचा निषेध करून राज्य शासनापुढे काही ठोस मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

सद्या कोरोना संसर्गामुळे राज्य शासनाने घातलेले निर्बंध पाळून आंदोलन होणार असल्याचेही ढोणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *