पुणे दि.२५: स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने शेतकी महाविद्यालय आवारातील हातकागद संस्थेत आयोजित राज्यस्तरीय प्रदर्शनाला मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांनी भेट दिली.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी.रेंदाळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बीपीन जगताप, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी. एन. बनसोडे, सहाय्यक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अमर राऊत आदी उपस्थित होते.
प्रदर्शनात काही वैशिष्ठ्यपूर्ण वस्तू असल्याने नागरिकांसाठी ही विशेष पर्वणी ठरेल आणि उद्योजकांसाठी ही चांगली संधी ठरू शकेल, असा विश्वास यावेळी श्रीमती सिन्हा यांनी व्यक्त केला.
प्रदर्शन ३ मार्चपर्यंत सुरू राहणार असून त्यात खादीचे कपडे, कोल्हापूरी चप्पल, महाबळेश्वरचा मध, विविध मसाले, पापड आणि हस्तकलेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामोद्योगाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहनदेखील श्रीमती सिन्हा यांनी केले आहे.