प्रतिनिधी : जनतेच्या हितासाठी ग्रामपंचायत कार्यालयात वेगवेगळ्या निवडलेल्या समित्या, कृषिवार्ताफलक, विविध पदनाम व संपर्क क्रमांक असलेला माहिती फलक लावा आणि तक्रारपेटी बसवा या मागणीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड यांनी ग्रामसेवक यांना निवेदन दिले.
माळेवाडी-बोरगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, सर्व सदस्य, शिपाई, संगणक ऑपरेटर यांची नावे व संपर्क क्रमांक असलेला माहिती फलक तसेच ग्रामसेवक, तलाठी मंडलाधिकारी, कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्या गावभेट दिवसाचा उल्लेख असलेला फलक तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या कार्यालयीन फोन नंबर, पदनाम व ई-मेल आयडी असे वेगवेगळे माहिती फलक कोठेही लावलेले दिसत नाहीत. माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याचा बोर्ड ही दिसत नाही ग्रामपंचायत कार्यालयाचे निगडित असणाऱ्या ग्राम दक्षता समिती, ग्राम सुरक्षा समिती, तंटामुक्त समिती यांसारख्या समिती असतात, त्यांचा कुठे माहिती फलक लावलेला आढळून येत नाही त्यामुळे शेतकरी-कामगार, विद्यार्थी, नागरिक वर्गाची हेळसांड होत आहे. दर्शनी भागात कार्यालयामध्ये माहिती फलक लावण्यात व तक्रार नोंद वही- ग्रामसेवक हालचाल नोंदवही ठेवण्यात यावी आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात नागरिकांच्या हितासाठी तक्रारपेटी तात्काळ बसविण्यात यावी या मागणीचे निवेदन ग्रामसेवक राजेश निंबाळकर यांना देण्यात आले या मागणीची दखल घेतली नाही, तर कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी शिवराम गायकवाड यांनी दिला.