भाग -३ आजच्या सदरामध्ये आपण पाहणार आहोत हेल्दी डाएट तेजस्वी त्वचेसाठी कोणता आहार योग्य आहे.
आज-काल प्रत्येकाला निरोगी आणि तेजस्वी त्वचा हवी असते आणि त्यासाठी ते हानीकारक रसायनांने भरलेले विविध कॉस्मेटिक्स उत्पादन देखील वापरतात , परंतु तुम्हाला माहित आहे का. की फक्त योग्य आहाराच्या साह्याने तुम्ही निरोगी आणि नितळ त्वचा मिळवू शकता? होय, असे काही पदार्थ आहेत जे तुमच्या त्वचेला योग्य जीवनसत्वे आणि पोषकद्रव्ये पुरवण्यास मदत करतात
आहर आणि ते त्वचेला नैसर्गिक ग्लो देण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. तुमच्या त्वचेची स्थिती तुमच्या शरीराच्या आरोग्याचे निश्चित लक्षण आहे, इतकेच नाही तर निरोगी त्वचा तुमचा आत्मविश्वास वाढवते. तुमच्या त्वचेला अधिक चांगले, * निरोगी ठेवण्यासाठी आणि ग्लो आणण्यासाठी दैनंदिन आहारात तुम्ही पुढील काही पदार्थांचा समावेश करू शकता.
१) संत्री : संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेचा टोन आणि पोत सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. कारण, ते कोलॅजेन प्रोटिन तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील आहेत, जे फ्री रॅडिकल्सद्वारे होणारे त्वचेचे ऑक्सिडेशन आणि त्यामुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यात हातभार लावते.
२) अक्रोड : अक्रोडामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, सेलेनियम आणि झिंक अधिक प्रमाणात असतात, जे त्वचा निरोगी राहण्यास मदत देतात. इतर सुक्या मेव्यांच्या तुलनेत अक्रोडमध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा -६ फॅटी अॅसिड अधिक असतात. या .गुणधर्मांमुळे त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी अक्रोड ही योग्य निवड ठरते.
३) गाजर : गाजर हे व्हिटॅमिन ‘ए’चा चांगला स्त्रोत आहे, जो सुरकुत्या आणि पेशींच्या मृत्यूशी लढण्यास मदत करतो, त्याचबरोबर गाजर आपल्या त्वचेला निरोगी आणि नैसर्गिक ग्लो आणण्यास देखील मदत करते. त्वचेचे सूर्यापासून संरक्षण करून होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत करते.
४) टोमॅटो : टोमॅटो हा व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीनसारख्या प्रमुख कॅरोटीनॉइड्सचा उत्तम स्रोत आहे, ज्याने त्वचेला सूर्यप्रकाशापासून होणारे नुकसान आणि त्वचेला पडणाऱ्या सुरकुत्यांपासून संरक्षण मिळते. त्यांच्यामध्ये त्वचेच्या पेशींचे आकुंचन करण्याचे गुणधर्म आहेत, जे अतिरिक्त सीबम उत्पादन कमी करते. ज्याने त्वचेच्या पृष्ठभागावर तेल जमा होण्याचे प्रमाण कमी होते.
५) अंडी : अंडी हे एक सुपरफूड आहे, ज्यामध्ये बायोटिन असते जे कोरड्या त्वचेचा सामना करण्यास मदत करते. अंड्यातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे सल्फर, जो निरोगी त्वचेसाठी आवश्यक आहे. अंडी त्वचेला आतून पोषण देऊन निरोगी ठेवण्यास मदत करतात.
६) बीट : बीटरूट तेलकट त्वचेला मुरूम आणि डागांविरुद्ध लढण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. एक ग्लास ताज्या बीटरूटचा रस तुमच्या त्वचेला तजेला आणण्यास मदत करतो. बीटरूट रक्तातील विषारी घटक काढून रक्त शुद्ध कारण्यास मदत करते. ते तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आणि येणारी खाज कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.
( डॉ. रोहिणी पाटील)