पुणे, दि. 8: पुरंदर तालुका कृषी अधिकारी, आत्मा व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे व तालुका कृषी अधिकारी पुरंदर सुरज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठिबक सिंचन पंधरवडा तसेच सीताफळ उन्हाळी बहार नियोजन, छाटणीचे प्रात्यक्षिकात्मक स्वरुपात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी तज्ज्ञांनी ठिबक सिंचन संचाची निगा तसेच सीताफळ छाटणी यासंदर्भात मार्गदर्शन केले. झाडाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी देतांना झाडाची किंवा पिकाची मुळे जितक्या खोलीवर जातात तेवढ्या आकाराचा खड्डा घ्यावा व त्या खड्डयात किती वेळात पाणी मुरते तेवढा वेळ ठिबक संच चालू ठेवावा. ठिबकचा स्क्रीन फिल्टर हा पंधरा दिवसातून एकदा स्वच्छ करावा. लॅटरल सल्फ्युरिक ॲसिडने शेवटची कॅप काढून स्वच्छ कराव्यात त्यामुळे ठिबक सिंचन संचाचे आयुष्यमान वाढेल, असे यावेळी सांगण्यात आले.

सिताफळ बागेची छाटणी करताना लागवड केल्यानंतर एक ते दीड फुटावर पहिली छाटणी करुन त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक फांदीला तीन ते चार फांद्या ठेवून झाडाला छत्रीचा आकार द्यावा. सीताफळाच्या झाडाची छाटणी करताना मध्यभाग मोकळा ठेवल्याने सूर्यप्रकाश सर्व झाडावर पडतो. त्यामुळे बुरशीजन्य रोगापासून फळांचे संरक्षण होते तसेच सीताफळ काळी पडणे या विषयी नियंत्रणासाठी एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी घेणे तसेच झाडाच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावणे फायद्याचे होते.

मिलीबग नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियमची चार ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी. झाडाच्या खोडाला उलटी चिकटपट्टी लावल्यास झाडावरती जाणारे कीटक चिकटून बसून पुढील उपद्रव कमी होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सासवडचे कृषी पर्यवेक्षक गणेश जगताप म्हणाले, ठिबक सिंचनासाठी या वर्षीपासून 75 ते 80 टक्के अनुदान देण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेत पाण्याची बचत करावी तसेच झाडांना आवश्यक तेवढेच पाणी दिल्याने उत्पन्नात वाढ होईल.

यावेळी वनपुरीचे कृषी पर्यवेक्षक गणेश जगताप, कृषी सहाय्यक योगेश गिरासे, आत्माच्या श्रीमती वरपे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *