पुणे, दि. 4 : कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी पुरंदर तालुक्यातील विविध नाविन्यपूर्ण व पथदर्शी कृषी उपक्रमाला भेटी देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
श्री. कुमार यांनी सिंगापूर येथील पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनी, गुऱ्होळी येथील गणेश जाधव यांची अंजीर बाग,राजेवाडीतील श्रीरंग कडलग यांचे सामूहिक शेततळे व फळबाग लागवड, आंबळे येथील माणिक जगताप यांनी केलेली कार्नेशन व शेवंती लागवड, वनपुरीमध्ये राजेंद्र कुंभारकर यांच्याकडील भाजीपाला प्रक्रिया युनिट आणि दिवेतील श्रीराम शेतकरी समूह गट उत्पादक कंपनी इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, पुरंदर तालुक्यात अंजीर आणि सीताफळ या फळांचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांकडून अंजीर व सीताफळ खरेदी करून फळाचे देशपातळीवर ब्रँडिंग करुन पुरवठा करते. त्यामुळे पुरंदरच्या अंजिराची चव देशात प्रसिद्ध आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांनी प्रगती करावी. पुरंदर तालुक्यात कृषी विषयक योजनांच्या अंमलबजावणीचे काम चांगले होत असल्याबाबत समाधान व्यक्त करत पुरंदर तालुका कृषी प्रक्रीया उद्योगाचे केंद्र असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, मंडळ कृषी अधिकारी वाघमारे, कृषी पर्यवेक्षक सर्वश्री. कांबळे, बनसोडे, जगताप,खेसे संबंधित कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.