बारामती येथील डॉ. हर्षल राठी यांनी केलेली शस्त्रक्रिया ठरली यशस्वी…

बारामती दि. १४,जानेवारी : आपलं जन्माला आलेलं मुलं अंध असेल किंवा त्याला अनुवांशिक वंध्यत्व आहे ते समजल्यावर काय अवस्था होत असेल त्या पालकांची… असंच एक कुटुंब या संकटाचा सामना करत होतं, परंतु कुठून तरी माहिती मिळाली की बारामती मध्ये यावर उपचार होऊ शकतात मग ते कुटुंब थेट बारामती मधील डॉ राठी यांच्यापर्यंत येऊन पोहोचले आणि ही किमया पार पडली… या मुलीचं वय होतं फक्त १०. एका आनुवंशिक आजारामुळे ती जन्मतः अंध होती. तिने आत्तापर्यंत पाहिला होता फक्त अंधार! पूर्वी एक नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया झाली पण ती दुर्दैवाने अयशस्वी ठरली होती. तिचे आईवडील तिला बारामती चे कोर्निया तज्ञ डॉ. हर्षल राठी यांच्याकडे घेऊन आले. त्यांच्या प्रिझ्मा आय केअर मध्ये बुबुळाची शस्त्रक्रिया होते असे त्यांना कळाले होते. योग्य त्या चिकित्सा व तपासण्या पूर्ण झाल्यावर डॉ. हर्षल राठी यांनी नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया परत करण्याचा निर्णय घेतला. बारामती येथे नेत्रपेढी नसल्याने हैद्राबाद येथून बुब्बुळ मागविण्यात आले व लगेचच शस्त्रक्रिया करण्यात आली आणि
शस्त्रक्रिया यशस्वी झाली. यासाठी भुलतज्ञ डॉ. संतोष घालमे याचे सहकार्य लाभले. जन्मतः पांढरे झालेले बुब्बुळ (दृष्टिपटल) काढून त्याजागी नवीन पारदर्शक बुब्बुळ बसविण्यात आले. शस्त्रक्रिया तर उत्तमरीत्या झाली पण मुलीच्या आईवडिलांना शंका होती दिसेल का नाही व याबद्दल धाकधूक होत होती. दुसऱ्या दिवशी डोळ्यांवरची पट्टी काढली आणि मुलीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. आईने तिला विचारले “दिसतंय का सोनूली ला” ती म्हणाली “हो आई”. तिने आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या आईला व इतर कुटुंबियांना बघितले. सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. आणि डोळ्यामध्ये आनंद अश्रू दरवळले. आज या परिवारासाठी मकर संक्रांतीचा गोडवा नक्कीच दुगुनित झाला. तिच्या दुसऱ्या डोळ्याला देखील हीच व्याधी असून लवकरच त्याची पण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ राठी यांनी दिली आहे व अशा प्रकारची शस्त्रक्रिया बारामतीमध्ये पहिल्यांदाच झाली असे डॉ. राठी यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *