प्रतिनिधी – कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मळद येथे ऊस पाचट व खोडवा व्यवस्थापन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा, भीमा नदी व कॅनॉलची सिंचन सुविधा असल्याने ऊस पिकाचे क्षेत्र मोठया प्रमाणात आहे. तालुक्यात ४ साखर कारखाने व ५०० च्या जवळपास गुऱ्हाळघरे आहेत. ऊस पीक तुटल्यावर उसाचे निघणारे पाचट सुद्धा मोठ्या प्रमाणात निघत असते. नजीकच्या काळात बरेच शेतकरी पाचट न जाळता त्याची कुट्टी करून ते पाचट जमिनीवर आच्छादित करता किंवा गाडून टाकतात परंतु अजूनही काही शेतकरी पाचट जाळून टाकतात व मोठ्या प्रमाणात सेंद्रीय खताचे नुकसान करून घेत असतात आणि हवेमध्ये वायू प्रदूषण होते ते वेगळेच. या सर्व गोष्टींचा विचार करून पुणे जिल्ह्यात कृषि विभागानंतर्गत ऊस पाचट व्यवस्थापन अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी बांधवाना पाचट ठेवण्याचे फायदे, पाचट व्यवस्थापणाच्या पद्धती, पाचट कुजविण्यासाठीच्या लागणाऱ्या उपाययोजना याबाबत गेली ४ ते ५ महिन्यानंपासून पुणे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, आत्माचे पुणे जिल्हा प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, उपसंचालक पूनम खटावकर, उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे व दौंडचे तालुका कृषि अधिकारी राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान स्वरूपात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने आज तालुक्यातील मळद येथे कृषि विभाग व आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे दौंड तालुक्याचे आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांनी सांगितले. या कार्यक्रमात पाटस चे मंडळ कृषि अधिकारी एम.पी. जगताप यांनी ऊस खोडवा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. अंगद शिंदे यांनी शेतकऱ्यांना पाचट कुजवताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. तसेच आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी पाचट व्यवस्थपणाचे फायदे, पाचट कुजविण्यासाठी उपयोगी असणारे जीवाणु, उसाचे बुडखे छाटणी करण्याची पद्धत, पाचट व्यवस्थापणामध्ये खताची द्यावयाची मात्रा व पाणी व्यवस्थापन याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मयुर रणवरे यांच्या शेतावर दाखविण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाचट कुजवणारे जिवाणू कल्चर वाटप करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी कृषि पर्यवेक्षक संजय कदम, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विनोद कुलकर्णी, मयूर रणवरे, हनुमंत दुधे, भरत म्हेत्रे, संदीप गायकवाड, संजय दुधे, संजय शेलार, सुनील दुधे, अमित लडकत, किसन घागरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार मळद गावचे कृषि सहाय्यक अझरुद्दीन सय्यद यांनी केले व पाचट व्यवस्थापन करण्याचे आव्हान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *