बारामती दि.7: बारामती तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत मळद येथे नुकतीच (5 जानेवारी) क्रॉपसॅप अंतर्गत हरभरा पीक शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी हरभरा पिकावरील घाटेअळी व मर रोग यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मंडल कृषी अधिकारी सी. के. मासाळ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अन्न प्रक्रिया उद्योगास चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व उन्हाळी सोयाबीन पेरणीबाबत माहिती दिली. महाडीबीटी पोर्टलद्वारे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती कृषी पर्यवेक्षक जे. एन. कुंभार यांनी दिली.
गंध सापळे, नीम अर्क वापरण्याचे आवाहन यावेळी कऱ्हावागजचे कृषी सहाय्यक एस. पी. पिसे यांनी केले. रोजगार हमी योजना अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या फळबाग लागवड, नाडेफ, गांडूळ खत प्रकल्पाची माहिती कृषी सहायक मनीषा काजळे यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकता बचत गटाचे अध्यक्ष प्रशांत शेंडे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच योगेश बनसोडे, बारामती सहकारी बँकेचे संचालक शिरीष कुलकर्णी, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी हनुमंत देवकाते व गावातील प्रगतशील शेतकरी उपास्थित होते. या शेतीशाळेचे नियोजन कृषी सहाय्यक श्रीमती काजळे यांनी केले.