पुणे, दि.31 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पुणे जिल्हा परिषद आणि भोर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भोर तालुक्यातील नसरापूर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात कंपन्यांकडून रोजगारासाठी ४११ युवक- युवतींची पहिल्या फेरीत निवड करण्यात आली आहे.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत आणि दीन-दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतर्गत नसरापूर येथील कुंभारकर लॉन्स मंगळवारी (२८ डिसेंबर) रोजी हा रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात भोर, पुरंदर, वेल्हा तालुक्यातील ७४० युवक- युवतींनी नोंदणी करून मुलाखती दिल्या. या मेळाव्यात २३ कंपन्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोदवला. या कंपन्यांमार्फत नोंदणी केलेल्या बेरोजगार युवक-युवतीपैकी ४११ विद्यार्थ्यांची मुलाखतीच्या प्रथम फेरीमध्ये निवड करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू , दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना- ‘उमेद’च्या राज्याच्या अभियान व्यवस्थापक श्रीमती अनिता कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष्य श्री. रणजीत शिवतारे, ‘उमेद’च्या जिल्हा अभियान व्यवस्थापक श्रीमती त्रिवेणी भोंदे, जिल्हा व्यवस्थापक श्रीमती सोनाली अवचट, भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, वेल्हे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. विशाल शिंदे, भोर, वेल्हा,पुरंदर तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.