बारामती, दि.6:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील माळेगाव बु. येथील ‘राजहंस संकुल’ या संस्थेच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समिती सभापती नीता फरांदे, एकात्मिक विकास पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समितीचे उपसभापती रोहित कोकरे, मुख्याधिकारी स्मिता काळे, सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘राजहंस संकुल’ च्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम चांगल्या प्रकारे झाले आहे. या संकुलात राजहंस दूध संस्था, प्रतिभा विकास सहकारी सोसायटी व प्रतिभा ग्रामीण बिगरशेती सहकारी प्रतसंस्था या तीन संस्थेची कार्यालये आहेत. सहकारी संस्थांचा गरजूंना फायदा झाला पाहिजे. तीनही संस्थांच्या प्रगतीचा आलेख उंचावत राहील अशी अपेक्षा करुन संस्थेच्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कोरोनाबाबत बोलतांना श्री. पवार म्हणाले, सध्या ‘ओमायक्रॅान’ या कोरोनाच्या नवीन विषाणूचा संसर्ग दिसून येत आहे. या नव्या विषाणूच्या प्रसाराचा वेग खूप मोठा आहे. त्यास नागरिकांनी घाबरुन न जाता कोरोना नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे. नागरिकांनी दोन्ही लसींची मात्रा न चुकता घ्यावी यात कोणीही हलगर्जीपणा करु नये, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, राजहंस दूध संस्था व संचालक मंडळाचे चेअरमन रणजित तावरे, प्रतिभा विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन विलास तावरे, प्रतिभा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत तावरे, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *