नोडल प्रशिक्षण संस्थेत नोंदणी करुन अभ्यासक्रमात सहभागी होता येणार

पुणे दि22.: कृषि निविष्ठा विक्रेत्यासाठी सीसीआयएम आणि आएनएम ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. कृषि निविष्ठा परवानाधारकांना आवश्यकतेनुसार नोडल प्रशिक्षण संस्थेत नोंदणी करुन अभ्यासक्रमात सहभागी होता येणार आहे.

जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेत्यापैकी बऱ्याचशा निविष्ठा विक्रेत्याकडे कृषि विषयक पदवी,पदविका शैक्षणिक अर्हता नाही. त्यानुषंगाने केंद्र शासनाच्या सुचनेनुसार अशा विक्रेत्यांनी वेळेत आवश्यक तो अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण होणार नाही.

केवळ खतांचा परवाना असलेल्यांनी आयएनएम प्रमाणपत्र अभ्यासक्रम करणे गरजेचे आहे, तर फक्त किटकनाशकांचा परवाना असलेल्यांनी केवळ सीसीआएम प्रमाणपत्र अभ्यासक्रम (ऑनलाईन पदधतीने) करणे गरजेचे आहे.

कृषि निविष्ठा विक्रेत्याकरिता कृषि पदविका अभ्यासक्रम (देसी/डीएईएसआय) आहे. अभ्यासक्रम १ वर्ष (४८ आठवडे रविवार किंवा आठवड्यातील एक दिवस) असून वर्गाची क्षमता एकुण ४० प्रशिक्षणार्थी प्रति वर्ग यानुसार आहे. सदर अभ्यासक्रमासाठी अनुदानित तत्त्वावरील वर्गास प्रशिक्षणार्थी शुल्क रूपये १० हजार प्रति निविष्ठा विक्रेता तर विनाअनुदानित तत्त्वावरील अभ्यासक्रमास २० हजार रूपये प्रति निविष्ठा विक्रेता यानुसार आकारण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक अर्हता प्राप्त नसलेल्या खते, औषधे व बि-बियाणे अशा तिनही निविष्ठा विक्रेते धारकांना ‘देसी’ अभ्यासक्रम आवश्यक आहे. सदर निविष्ठा विक्रेता हा किमान दहावी उत्तीर्ण असावा व त्यांनी ‘देसी’ अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित नोडल प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करावी. प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती), शिवाजीनगर, पुणे, कृषि विज्ञान केंद्र, बारामती या संस्थांना नोडल प्रशिक्षण संस्था म्हणून मंजूरी आहे.

कीटकनाशके कृषि विक्रेत्याकरिता तीन महिन्याचा (१२ आठवडे रविवार किंवा आठवडयातील एक दिवस) सीसीआयएम ऑफलाईन अभ्यासक्रम आहे. वर्गाची क्षमता एकुण ४० प्रशिक्षणार्थी प्रति वर्ग यानुसार आहे. मार्गदर्शक सूचनेनुसार सदर अभ्यासक्रम हा विनाअनुदानित तत्त्वावर असून ७ हजार ६०० प्रति विक्रेता यानुसार शुल्क आकारणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त नसलेल्या फक्त किटकनाशके विक्रेतेधारकांसाठी सीसीआयएम अभ्यासक्रम आवश्यक आहे. सीसीआयएम अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विहित नमुन्यातील अर्ज भरुन कृषि विज्ञान केंद्र बारामती या नोडल प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करावी.

कीटकनाशके विक्रेत्याकरिता सीसीआयएम ऑनलाईन हा सलग बारा दिवसाचा अभ्यासक्रम असून वर्गाची क्षमता एकुण ४० प्रशिक्षणार्थी प्रति वर्ग यानुसार आहे. मार्गदर्शक सुचनेनुसार सीसीआयएम हा विनाअनुदानित तत्त्वावर असून ४ हजार ५०० रूपये प्रति विक्रेता यानुसार शुल्क आकारणी करण्यात आली आहे.

आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त नसलेल्या फक्त किटकनाशके विक्रेतेधारकांना या अभ्यासक्रमासाठी विहित नमुन्यातील अर्ज पुर्णपणे भरुन कृषि विज्ञान केंद्र बारामती/नारायणगाव, पद्मश्री प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था (रामेती) पुणे, पशुसंवर्धन महाविद्यालय बारामती, पद्मश्री अप्पासाहेब पवार कृषि तंत्रनिकेतन महाविदयालय बारामती, ग्रामोन्नती मंडळ कृषि तंत्रनिकेतन महाविद्यालय नारायणगाव, कृषि व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नारायणगाव , शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान पुणे यापैकी एक प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करता येईल.

खते विक्रेत्यांकरिता सीसीआयएनएम हा १५ दिवसाचा विनाअनुदानित अभ्यासक्रम असून वर्गाची क्षमता एकुण ३० प्रशिक्षणार्थी प्रति वर्ग यानुसार आहे. अभ्यासक्रमासाठी रूपये १२ हजार ५०० प्रति विक्रेता यानुसार शुल्क आकारण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त नसलेल्या खत विक्रेतेधारकांसाठी सीसीआयएनएम अभ्यासक्रम आवश्यक आहे. खत विक्रेता हा किमान दहावी उत्तीर्ण असावा. सीसीआयएनएम अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विहित नमुन्यातील अर्ज पुर्णपणे भरुन कृषि विज्ञान केंद्र बारामती, कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव, कृषि महाविद्यालय पुणे किंवा शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान पुणे यापैकी कोणत्याही नोडल प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करावी.

कृषि निविष्ठा परवानाधाराकांनी आवश्यकतेनुसार नोडल प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करुन अभ्यासक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक आर.डी. साबळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक आत्मा पुणे कार्यालयाच्या 020-25530431 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *