पुणे दि.20:- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये अद्याप आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरण तसेच तक्रार निवारणासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क साधणे आवश्यक असून या विशेष मोहिम कालावधीत आधार प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक आहे. तालुकास्तरीय समितीकडे तक्रार दाखल केली आहे अशा शेतकऱ्यांनी तालुक्याच्या तहसिलदारांशी आवश्यक त्या कागदपत्रांसह समक्ष संपर्क साधावा.
ही योजना अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरणाची ही अंतिम संधी असून आधार प्रमाणीकरण न झाल्यास त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही. लवकरच शिल्लक लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून यादीतील शेतकऱ्यांचेही आधार प्रमाणीकरण या विशेष मोहिमेत पूर्ण करुन घेण्यात येणार आहे. तरी पात्र सभासद, शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी केले आहे.