पुणे दि.१५-कामगार उप आयुक्त पुणे कार्यालयामार्फत असंघटित कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या नोंदणी अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रथम नोंदीत झालेल्या कामगारांना ‘ई-श्रम’ कार्ड वाटप करण्यात आले.
यावेळी कामगार उपयुक्त अभय गिते, सहायक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड उपस्थित होते. केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यास अनुसरुन कामगार उप आयुक्त पुणे कार्यालयामार्फत ११ ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील असंघटित कामगारांची नोंदणी करुन घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
नोंदणी अंतर्गत असंघटित कामगारांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर दिला जाणार आहे. त्यामुळे शासकीय नोंदीत ‘ई-श्रम’ कार्डच्या रुपाने असंघटित कामगारांना ओळख मिळणार आहे. असंघटित कामगार, छोटे व्यापारी, फेरीवाले, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती आदींना त्याचा लाभ होणार आहे.
‘ई-श्रम’ पोर्टलवर नोंदणी केल्यावर संबंधितांना दोन लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार आहे. तसेच भविष्यातील सरकारी योजनांचाही लाभ मिळू शकणार आहे. या नोंदणी अभियानांतर्गत जास्तीत जास्त असंघटित कामगारांनी नोंदणी करावी, असे आवाहन श्री. गिते यांनी केले आहे.