बारामती दि. 15 :- बारामती औद्योगिक उत्पादक असोसिएशन यांच्यावतीने उद्योजक व कामगार बांधवांसाठी आयोजित मोफत लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. दिवाळीपर्यंत शंभर टक्के लसीकरण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
कार्यक्रमाला एकात्मिक विकास पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, बारामती औद्योगिक उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार आदी उपस्थित होते.
सर्व उपस्थित नागरिकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन श्री. पवार म्हणाले, राज्यात मिशन कवच कुंडल आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. बारामती तालुक्यात आत्तापर्यंत 78 टक्के नागरिकांनी लशीची पहिली मात्रा तर 48 टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. दिवाळीपर्यंत 100 टक्के लसीकरण होईल यादृष्टीने प्रयत्न करावे.
इतर राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रात लसीकरणाची कामगिरी चांगली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 9 कोटीच्या वर लसीकरण झाले आहे. सर्वांना लस मिळाली पाहीजे. जगातील काही देशात कोरोनाची तिसरी लाट आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारीने घेणे गरजेचे आहे. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्राकडून आदेश येताच कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
बारामतीतील औद्योगिक वसाहत नेहमीच चांगले कार्यक्रम घेण्यात अग्रेसर असल्याचे नमूद करून नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून सण साजरे करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी आदित्य हिंगणे मित्र परिवारातर्फे कोविड लसीकरणासाठी आवश्यक असणारे 1100 इंजेक्शन सिरिंज श्री. पवार यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्याकडे देण्यात आले.
बारामती परिसरातील विकास कामांची पाहणी
कार्यक्रमापूर्वी श्री.पवार यांनी आज बारामती येथील परकाळे बंगला येथील कॅनलवरील सुशोभिकरण, पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे बांधकाम व कऱ्हा नदीवरील दशक्रिया विधी घाट, इत्यादी कामांची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, गटविकास अधिकारी अनिल बागल, गटनेता सचिन सातव, मुख्याधिकारी महेश रोकडे उपअभियंता राहूल पवार आदी उपस्थित होते.
पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या सभोवती संरक्षक भिंतीचे काम चांगल्या दर्जाचे करावे. वास्तू विषारदाच्या सल्ल्यानुसार चांगली व दर्जेदार कामे करुन घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *