पुणे दि.12: पॉस मशिन आणि गोदामातीळ प्रत्यक्ष साठा न जुळल्याने दोन खत विक्रेत्याचे विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
जुन्नर येथील कृषि अधिकारी यांच्यामार्फत दोन खत विक्रेत्यांची खत विक्री परवाना तपासणीदरम्यान युरीया खताचा पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्षात गोदामातील शिल्लक साठा यामध्ये तफावत आढळून आल्याने परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी संबंधित खत विक्री केंद्रावर निलंबनाची कारवाई केली आहे.
केंद्र शासनाने डीबीटी योजनेअंतर्गत अनुदानित खत विक्रीसाठी पाँस मशिनचा वापर अनिवार्य केला आहे. युरीया तसेच इतर अनुदानित खते ही पॉस मशिनमधून विक्री न झाल्यास ती मशिनवर शिल्लक दिसतात व यामुळे पुढील हंगामामध्ये केंद्र शासनाकडून मिळणारे खताचे आवंटन कमी होते. यासाठी हंगामामध्ये आवश्यक युरीया तसेच इतर अनुदानित खत मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत. यासंदर्भात अधिनस्त गुणवत्ता नियंत्रण निरिक्षकांना सुचित केले आहे. तसेच मोहिम स्वरुपात अनुदानित खत विक्रेत्यांची तपासणी केली जाईल व ज्या विक्रेत्यांचा मशिनवरील साठा व प्रत्यक्षातील गोदामातील साठा जुळणार नाही त्यांचे विक्री परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.
सर्व विक्रेत्यांनी विक्री केंद्राच्या दर्शनी भागात अनुदानित खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत आणण्याबाबतचे फलक लावावेत. कोणत्याही परिस्थितीत अनुदानित खतांची विक्री ही पॉस शिवाय होणार नाही याची सर्व विक्रेत्यांनी नोंद घ्यावी, तसेच सर्व अनुदानित खत खरेदीला जाताना सोबत आधार कार्ड व खत विक्रेत्यांकडुन खरेदी वेळी मशिनवरुनच खत विक्रीचा आग्रह करा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.