प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी मौजे निरावागज येथे क्रॉपसॅप सलग्न सोयाबीन पिकाची महिला शेतीशाळा वर्ग क्रमांक 10, शेतीदिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी सौ सुप्रिया बांदल तालुका कृषी अधिकारी बारामती यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण सोयाबीन प्रकल्प, सोयाबीन शेतीशाळा इत्यादी योजनांविषयी मार्गदर्शन केले.
शेतीदिन कार्यक्रमासाठी मार्गदर्शक शास्त्रज्ञ श्री तुषार जाधव कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी निर्यातक्षम भाजीपाला, सोयाबीन प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन साखळी तयार करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन व चर्चा केली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी बारामती श्री चंद्रकांत मासाळ, कृषी पर्यवेक्षक श्री नेमाजी गोलांडे, कृषी सहाय्यक श्री कदम ऋषिकेश, श्रीमती ज्योती गाढवे, सरपंच सौ विद्या भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी निरावागज येथील श्री रणजीत धायगुडे यांच्या भाग्यलक्ष्मी फुड प्रोसेसिंग कंपनी श्री भालचंद्र देवकाते यांचा सोयाबीन प्रकल्पातील प्रात्यक्षिक प्लॉट तसेच श्री बाळासाहेब शेटे व श्री रणजीत देवकते यांच्या महाडीबीटी अंतर्गत अनुदानित ऊस पाचट कुट्टी व नांगर या अवजारांची तपासणी करण्यात आली. यावेळी निरावागज मधील वाघेश्वरी शेतकरी बचत गट, शरद सेंद्रिय शेतकरी बचत गटाचे महिला व पुरुष शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रगतशील शेतकरी माहिती आदान-प्रदान श्री हरिश्चंद्र धायगुडे यांनी केले, व कार्यक्रमास शेवटी सौ अनिता ज्ञानदेव देवकाते यांनी उपस्थितांचे आभार मानले.