बारामती, प्रतिनिधी : डुप्लिकेट नंबर टाकून गाडी वापरत असणाऱ्या विशाल विकास अहिवळे (वय २४ वर्षे) (रा. रेल्वे कॉलनी सोमंथळी ता.फलटण, जि सातारा) यास पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेत
कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बारामती विभागात पेट्रोलिंग करत असताना एक व्यक्ती डुप्लिकेट नंबर टाकून होंडा कंपनीची युनिकॉन गाडी वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी गाडीचा शोध लावत विशाल अहिवळे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे काळ्या रंगाची होंडा युनिकॉन
गाडी सापडली असून त्या गाडीवर दुसरी नंबर प्लेट असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीसांनी त्याच्या गाडीचा इंजिन नंबर आणि चासिचा नंबर चेक केला असता सदरील गाडीचा ओरिजनल नंबर (एम एच ४२ ए पी ५४१९) असल्याचे समजले. त्यावरून मूळ मालक यांना सम्पर्क करून गाडी चोरी गेली आहे का ? याबाबत चौकशी केली असता मूळ मालकाने १५ एप्रिल २०१९
रोजी सुपा येथून गाडी चोरीस गेली असल्याचे सांगितले. गाडी चोरी प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही गाडी आणि आरोपी विशाल विकास अहिवळे यास ताब्यात घेतले असून गुन्ह्यात पुढील तपासासाठी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख , अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पो उप निरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा विजय कांचन, पो हवा अभिजित एकशिंगे, पो ना स्वप्नील अहिवळे, पो कॉ धिरज जाधव , पो कॉ दगडू विरकर यांनी केली आहे.