माळेगाव, प्रतिनिधी :- कृषी विज्ञान केंद्र बारामती, पंचायत समिती पुरंदर आणि इफको कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण महा निमित्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण उन्नती प्रकल्प अंतर्गत आज पुरंदर तालुक्यातील 185 महिलांनी केंद्रास भेट दिली, इफको कंपनीमार्फत 100 महिलांना भाजीपाला बियाणे व शंभर रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी इफाकोचे राज्य विक्री व्यवस्थापक डॉ. एम एस पोवार, एम. एस. आर. एल. एम. चे तालुका अभियान व्यवस्थापक श्रीमती नंदा कुर्डे, तालुका व्यवस्थापक श्री गणेश किकले, केव्हीकेचे श्री संतोष गोडसे व यशदा पुनेचे श्री शिवाजी बिराजदार, प्रवीण प्रशिक्षक हे उपस्थित होते. पुरंदर तालुक्यातील नारायणपूर, नारायण पेठ, परिंचे, कोळविहिरे, बहिरवाडी, देवडी, चिलेवाडी, पानवडी इत्यादी गावातील महिलांचा यामध्ये सहभाग होता. उस्मानाबाद, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील ६० सरपंचांचा ही या कार्यक्रमास सहभाग होता. यावेळी बोलताना डॉ. पोवार म्हणाले आपले पूर्वज देशी धान्याचा, पिकांचा आहारामध्ये वापर करत होते, सध्या संकरित वानामुळे आहारा मध्ये तेवढे पोषण राहिले नाही, आहारामध्ये नाचणी, तीळ, आळू इत्यादी कॅल्शियम व लोह देणारे घटक घेतल्यास आपले पोषण चांगले राहील मात्र आपण त्याच्या गोळ्या खातो. श्री संतोष गोडसे यांनी परसबागेचे महत्व व त्यामध्ये लागवड करावयाच्या भाज्या बाबत माहिती दिली, सर्व महिलांना केंद्राच्या फॉर्मवरील विविध प्रकल्पांच्या भेटी देण्यात आल्या त्यामध्ये शेळी पालन, कुकुट पालन, गायींचा गोठा, रोपवाटिका, मत्स शेती ई. यादरम्यान माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. शरदचंद्रजी पवार यांचीही या महिलांसोबत भेट झाली, त्यांनी महिलांची विचारपूस केली, कोणत्या प्रकल्पातून आलात, माहिती मिळतेयका, तुमचे बचतगट आहेत काय, ई. महिलांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.