प्रतिनिधी:- अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बारामती आणि गरुडा एरोस्पेस प्रा. लि. कंपनी चेन्नई यांचे संयुक्त विद्यमाने ड्रोनद्वारे पिकावर औषध फवारणीचे प्रात्यक्षिकाचे आयोजन दि. ०९/०९/२०२१ रोजी करण्यात आले होते.
कृषि विज्ञान केंद्रा अंतर्गत शेतकऱ्यांना नेदरलँड व इस्राईल या देशामधील विविध तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे, जसे कि ठिबक सिंचन, स्वयंचलित खत व पाणी व्यवस्थापन यंत्रणा, भाजीपाला कलमी रोपे, भाजीपाला निर्यात व माती विना शेती तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. ड्रोनद्वारे पिकावर औषधे फवारणीच्या प्रात्यक्षिकामुळे पिक फवारणीसाठी लागणारे मनुष्यबळ कमी होत आहे, एकरी पाण्याचे प्रमाण व औषध हि कमी लागत आहे, ड्रोनची उपयुक्तता, शेतीमधील वापरास येणाऱ्या काळात असलेल्या संधी, त्यांची कार्यक्षमता, अर्थशास्त्र असे बरेच काम करण्याचे नियोजन केले आहे, आणि याचाच एक भाग म्हणून आजचे प्रात्यक्षिक आयोजित केले गेले होते.
शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत तंत्रज्ञान पोहचवणे आणि त्यांना ते आत्मसात करण्यास सांगणे यासाठी कृषि विज्ञान केंद्र नेहमीच अग्रेसर राहिले आहे. या प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी एकूण ३२ शेतकरी व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमासाठी आलेले विविध कृषि महाविद्यालयाचे एकूण ४१ विद्यार्थी उपस्थित होते. या प्रात्यक्षिकाचे आयोजन श्री. वाय.एल.जगदाळे विषय विशेषज्ञ- उद्यानविद्या यांनी केले. आणि यासाठी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एस.जाधव यांनी मार्गदर्शन केले. श्री. राजेंद्र पवार,चेअरमन, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांनी सर्वाना मागदर्शन केले आणि येणाऱ्या काळात असेच नव नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दाखविण्याच्या सूचना दिल्या.