बारामती (प्रतिनिधी, गणेश तावरे ) दि. ३१ ऑगस्ट २०२१): इस्कॉन बारामती संस्थेच्या वतीने सन २००४ पासून बारामती शहरामध्ये श्रीकृष्णजन्माष्टमी महोत्सव मोठ्या स्वरूपामध्ये आयोजित केला जातो. परंतु मागील वर्षी व याही वर्षी कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने जन्माष्टमी महोत्सव नागरिकांसाठी शासनाच्या सर्व निर्बंधांच्या अधीन राहून ऑनलाइन खुला करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन), बारामती या संस्थेच्या वतीने श्रीकृष्णजन्माष्टमी महामहोत्सव व संस्थेचे संस्थापक आचार्य स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या १२५ व्या अविर्भाव दिन महोत्सवाचे औचित्य साधत आध्यात्मिक शिक्षण प्रसार या दृष्टीने शहरात विविध उपक्रमांचे शासनाच्या निर्बंधाअनुसार व सामाजिक अंतर जपत ऑनलाइन आयोजन करण्यात आले. कृष्णभक्ती हे रत्न असून काही शतकांमध्ये ते हरवले होते, श्रील प्रभुपाद यांनी भगवत प्रेमाची मंदाकिनी प्रवाहित केली व पुनरुज्जीवन झाले. मनुष्य आपलया जीवन व्यवसायात संलग्न राहून सुद्धा भगवत परायण जीवन जगू शकतो असा आत्मविश्वास श्रीमान श्यामानंद दास यांनी श्रवण महोत्सवातील सुश्राव्य प्रवचन व प्रश्नोत्तरातून दिला. भागवताच्या आधारे आदर्श गुरू-शिष्य संवाद यावर त्यांनी प्रकाश टाकला. कृष्ण चरित्र, कृष्ण सिद्धांत व कृष्ण लीलांचे गुणगान दिव्य असून कृष्णभक्ती आपणास कशी लाभदायक आहे हे सोदाहरण श्रीमान गौरांगदास, B.Tech, IIT Mumbai यांनी त्यांच्या प्रवचनातून उद्धृत केले.
या महोत्सवानिमित्त भक्तीवेदांत गुरुकुलच्या शालेय विद्यार्थ्यांनी चित्रफितीच्या माध्यमातून बाल नाटिका व श्रीकृष्णांवरील विलोभनीय असे समूहनृत्य सादर केले. हरे कृष्ण मंदिराच्या श्री कुमुदवन परिसरातील आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिर व श्रीविग्रहांचे सौंदर्य खुलून दिसत होते. जप,भजन, किर्तन, आरती, श्री श्री राधा गोपीनाथ विग्रह यांचा पंचामृताने मर्यादित प्रतिनिधींच्या उपस्थितीत ऑनलाइन अभिषेक व भगवंतांसाठी पाच प्रतिनिधींच्या वतीने १२७ भोग अर्पण करण्यात आले. यावेळी श्रील प्रभुपाद, भारताचे आध्यात्मिक राजदूत यांचा गुणगौरव करण्यासाठी भक्तिमय जीवन प्रवास भित्तीचित्रे गॅलरी स्वरूपात ऑनलाईन माध्यमातून उलगडण्यात आला. या विविध प्रसंगी, मंदिर व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. या महोत्सवामध्ये श्रीश्री राधा गोपीनाथ मंदिर, मुंबई येथील वरिष्ठ भक्त श्रीमान शामानंद दास व लोकप्रिय वक्ते श्रीमान गोरांग दास(B.Tech., IIT, Mumbai) यांची ऑनलाइन प्रवचनशृंखला संपन्न झाली.
श्रील प्रभुपाद यांच्या अविर्भाव दिन महोत्सवानिमित्त श्रील प्रभुपाद यांना पुष्पांजली व आरती सोबत श्रीमान नंददूलालदास, श्रीमान शामानंद दास व विविध भक्तांकडून ऑनलाइन कृतज्ञतापूर्वक शब्दांजली अर्पण करण्यात आली.
या महोत्सवासाठी राबविलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमांचा लाभ बारामती तालुका व परिसरातील नागरिकांनी ऑनलाइन घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन झूम माध्यमातून यशस्वीरित्या पोहोचविण्यासाठी ऑनलाइन टेक्निकल सपोर्ट टीम यांनी अथक परिश्रम घेतले. या सर्व भक्तिमय कार्यक्रमांचे प्रसारण इस्कॉन बारामती मंदिराच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. या आयोजनासाठी हातभार उचललेल्या सर्वांचे आभार व्यवस्थापन समितीच्या वतीने मानण्यात येत आहेत. इस्कॉन बारामती येथील केंद्रप्रमुख म्हणून श्रीमान नंददुलालदास (B.Tech. IIT) यांचे अथक परिश्रम व मोलाचे मार्गदर्शन यामुळेच हा कार्यक्रम उत्साही वातावरणात यशस्वी होऊ शकला. प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे शुद्ध प्रतिनिधी श्रील प्रभुपाद यांच्या आशीर्वादाने नक्कीच आपले जीवन यशस्वी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. याही पुढे आपणा सर्वांचे सहकार्य असेच मिळत राहो ही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. असे जनसंपर्क अधिकारी श्री. बाळकृष्ण पेंढारकर यांनी कळविले आहे.