खरीप हरभरा व राजमा लागवडी संबंधी शेतकरी संशोधक परिसंवाद कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी (गणेश तावरे ) आयसीएआर- राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती येथे हरभरा व राजमा पिकांच्या खरीप हंगामातील लागवडी संबंधी चर्चा करण्यासाठी शेतकरी – संशोधक परिसंवाद दि. ऑगस्ट २४, २०२१ रोजी आयोजित करण्यात आला होता. वास्तविक पाहता भारतात हरभरा व राजमा ही पिके रबी हंगामात घेतली जातात. परंतु संस्थेच्या प्रायोगिक क्षेत्रावर काही निवडक जातींची खरीप हंगामात यशस्वी लागवड करण्याचा प्रयोग केला गेला. बारामती परिसरातील तसेच सातारा जिल्ह्यातील हरभरा व राजमा लागवड करणारे एकूण ३० शेतकरी या परिसंवादास उपस्थित होते. संस्थेचे संचालक डॉ. हिमांशु पाठक यांनी हरभरा व राजमा पिकांची खरीप हंगामात लागवड करण्यामधील संधी प्रकाशात आणल्या. उस व डाळिंबामध्ये एक आंतरपिक म्हणून या पर्यायावर चर्चा झाली. अधिक उत्पन्न, मातीमधील अन्नद्रव्यांचे संतुलन व हंगाम व्यतिरिक्त काळात हिरव्या हरभर्‍यासाठी याचे महत्व अधोरेखित केले. डॉ. जगदीश राणे प्रमुख, पाणी ताण व्यवस्थापन विभाग, यांनी बारामती व परिसरातील हवामानातील वैशिष्ट्यांमुळे व या पिकांची शरीरशास्त्रीय रचना लक्षात घेता, हरभरा लागवड करणे शक्य असल्याचे व हिरव्या घाट्यांची हंगामपूर्व उपलबद्धता करून अधिक उत्पन्न मिळविणे शक्य असल्याचे सांगितले. डॉ. गुरुमुर्ती, शास्त्रज्ञ, यांनी हा प्रयोग यशस्वी केला व प्रत्यक्ष प्लॉटवर शेतकर्‍यांचे मार्गदर्शन केले. अधिक उत्पन्न देणार्‍या व ६० ते ६५ दिवसांमध्ये तयार होणार्‍या हरबर्‍याच्या जातींबद्दल माहिती दिली. परिसरातील प्रगतशील शेतकरी श्री. अशोक तावरे, अध्यक्ष, प्रतिभा शेतकरी उत्पादक कंपनी, बारामती यांनी अशा परिसंवाद द्वारे ज्ञानाची देवाण घेवाण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. महेश कुमार, डॉ. बोरय्या, डॉ. एलिझा प्रधान, श्री. रवी कुमार यांनी शेतकर्‍यांसोबत लागवडीसंबंधी चर्चा केली. हेच तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या शेतावर प्रदर्शित करण्याचे तसेच पुढील हंगामात शेतकर्‍यांना हरभरा ब राजमा पिकांच्या सदर जातींचे बियाणे उपलब्ध करून देण्याचे ठरविले गेले. डॉ. प्रविण तावरे, प्रक्षेत्र व्यवस्थापक, यांनी सर्व आयोजक तसेच शेतकर्‍यांचे परिसंवाद यशस्वी केल्याबद्दल आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *