लाल चिखल धडा वाचून
काळीज चर्रर्रर्र झालं होतं
रडून रडून तेव्हा डोळ्यातलं
पाणी आटून गेलं होतं.
काल बापानं तर आज लेकानं
भररस्त्यात केला लाल चिखल
पिढ्यानपिढ्या हेच सुरुय तरीही
का बरं घेईना कुणीच दखल ?
युग बदललं सरकारं बदलली
पण आमचं दुःख तेच आहे.
किंचितसुद्धा उलगडा होत नाही
सांगा ना असा कोणता पेच आहे.?
पावसासोबत भांडता भांडता
पूर्वज गेले बिनबोभाट मरून.
अजून किती जाणार जीव
गळक्या भांड्यात पाणी भरून .
योजना आल्या पॅकेज आली
तरी आजार संपत नाही.
खरंच आजार संपत नाही की
संपू देण्यात हित नाही ?
जगाचा पोशिंदाच राहिलाय कुपोषित
बाकी सगळ्यांचं पोषण झालंय.
संशोधन करा संशोधकांनो
इंजेक्शन नक्की कुठं दिलंय ?.
कवी-विनोद अशोक खटके
9423859438