माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे) देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धों.आ.सातव (कारभारी) हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कसबा बारामती येथे बारामती नगरपरिषदेचे गटनेते मा. सचिन सातव यांच्या संकल्पनेतून धों.आ.सातव विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी दैनिक सकाळचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार शिवाजी गावडे यांची ‘रेषांची भाषा’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेमध्ये गावडे सरांनी विविध प्रकारचे भाव, घटना तसेच प्रसंग दाखवणारी विविध व्यंगचित्रे उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर साकारली. भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम, शरदचंद्रजी पवार साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची व्यंगचित्रे विद्यार्थ्यांसमोर काही मिनिटात रेखाटली. व्यंगचित्रे रेखाटत असताना त्यांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे लता मंगेशकर व डॉ.ए पी. जे.अब्दुल कलाम यांच्याविषयीच्या आठवणी जागविल्या.या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधान देखील त्यांनी केले. काही क्षणातच विविध प्रकारचे संदेश देणारी व्यंगचित्रे पाहून विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. विद्यालयाचे कलाशिक्षक महेंद्र दीक्षित यांनी या कार्यशाळेचे नियोजन केले. विद्यालयाचे प्राचार्य गणपत गवळी यांनी श्री.शिवाजी गावडे यांचे स्वागत केले तर उपशिक्षक अविनाश सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले.