पुणे दि.2- मत्स्यकास्तकारांना किसान क्रेडीट कार्ड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयातर्फे 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
मत्स्यकास्तकारांना मासेमारी साहित्य, तलावाचे नुतनीकरण, खेळते भागभांडवल मत्स्यबीज, शितपेटी खरेदी करणे, तलाव ठेके घेणे आदी कामांसाठी सावकार किंवा खाजगी अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांकडून कर्जरुपाने मदत घ्यावी लागते व त्यासाठी अधिक व्याज भरावे लागते. मच्छिमार आणि मत्स्यकास्तकारांना सहजपणे भांडवल उपलब्ध झाल्यास त्यांना मत्स्यव्यवसायाद्वारे उत्पन्न घेण्यास मदत होईल. यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मच्छीमार, छोटे मत्स्य व्यावसायिक, लहान मासळी विक्रेते मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडीट कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
मत्स्यकास्तकारांनी परिसरात होणाऱ्या शिबिराची माहिती घेण्यासाठी आणि अर्जासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाला भेट द्यावी किंवा 020-29510723 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अविनाश नाखवा यांनी केले आहे.