बारामती, दि. 26 : तालुक्यात पंतप्रधान पिक विमा योजना रब्बी हंगाम राबविण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.
पंतप्रधान पिक विमा योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्याना योजना ऐच्छिक आहे. खातेदार व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र असतील. या योजनेअंतर्गत सर्व पीकांसाठी 70 टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पीकांसाठी 5 टक्के मर्यादित ठेवण्यात आला आहे.
तालुक्यात रब्बी हंगामाकरीता रब्बी ज्वारी बागायत, रब्बी ज्वारी जिराईत, गहू बागायत, हरभरा, कांदा व उन्हाळी भूईमुग या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सहभाग नोंदवण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी साठी 30 नोव्हेंबर 2021, गहू बागायत, हरभरा व कांदा पिकांसाठी 15 डिसेंबर तर उन्हाळी भुईमूगासाठी 31 मार्च 2022 अशी आहे.
शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या शाखा, राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा, नजिकचे विविध कार्यकारी सोसायट्या, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बारामती यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी विमा कंपनी- एचडीएफसी इरगो इन्शुरन्स कंपनी, पुणे, विमा कंपनी प्रतिनिधी ऋषिकेश भिसे (8149439594). तसेच समाविष्ट पिकांची विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दराच्या माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय बारामती यांच्याशी संपर्क साधावा.
गर्दी टाळण्यासाठी अंतिम दिनांकाची वाट न पाहता त्यापुर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा हप्ता भरून योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहनही श्रीमती बांदल यांनी केले आहे.